माजलगाव : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांपूर्वी येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार केल्याची घटना घडली होती. या शाळेतील शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. या संशयित आरोपी शिक्षकास माजलगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
राज्यात शाळेत शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान घडली. या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी अज्ञात व्यक्ती विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या घटनेचा शहरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
माजलगाव शहरातील एका शाळेत बालवाडी आहे. या परिसरातील लहान मुले, मुली दररोज या ठिकाणी येतात. या परिसरातीलच एक साडेपाच वर्षांची चिमुरडी नियमित शाळेत येते. तिला शाळेतील एका अज्ञात इसमाने दि. २५ ते २८ सप्टेंबर रोजी अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडली. त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यात आले. घरी आल्यावर तिने शाळेत झालेली ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली. पांढरे कपडे घातलेल्या माणसाला मी ओळखते असेही तीने सांगितले. या घटनेनंतर चिमूरडीच्या पालकांनी माजलगाव पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली.
त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध लैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सदरील अल्पवयीन मुलीची अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तेंव्हा या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू व पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली. तसेच शिक्षकांच्या फोटोमधून सदरील चिमुरडीने संशयित आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकास अटक केली. सदरील शिक्षकास माजलगाव न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने संशयित आरोपी शिक्षकास ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
तर या प्रकरणी लहान चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचे माजलगावात तीव्र पडसाद उमटे. या प्रकरणाच्या विरोधात शहरवासियांनी उद्या माजलगाव बंदचे अवाहन केले आहे. या विषयाचे निवेदन माजलगाव शहर पोलिसांना देण्यात आले आहे.