गेवराईत चोरट्यांचा धुमाकूळ, नववर्षाच्या रात्री घर फोडले

Beed Crime News | दुचाकीसह वीस हजाराचा ऐवज लंपास, दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला
Beed Crime News
गेवराई येथे चोरट्यांनी कपाट फोडून मुद्देमाल लंपास केला. Pudhari Photo
Published on
Updated on

गेवराई : नववर्षाच्या रात्री गेवराईतील ताकडगाव रोडवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यावेळी एका घराचे गेटचे कुलूप तोडून पोर्चमधील मोटारसायकल पळविली. तसेच एका घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आतमधील काही नगदी रकमेसह 20 हजारांचा ऐवज पळवला. तसेच इतर दोन ठिकाणी मोटारसायकलचे लाँक तोडत असतानाच घरातील नागरिकांना जाग आल्याने आरडाओरड होताच चोरट्यांनी सदरील ठिकाणाहून धुम ठोकली. त्यामुळे या दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला असला तरी नवीन वर्षाच्या रात्रीच चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे करत नागरिकांच्या झोपा उडवल्या. दरम्यान या चोरीच्या घटनेप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई शहरात काही ठराविक दिवसाच्या अंतराने चोरीच्या घटना सातत्याने होताना दिसत आहेत. बाजारात मोबाईल चोरी, बसस्थानकावर पॉकेट मारी तसेच दुचाकी, चारचाकी चोरीच्या घटनेने अगोदरच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना मंगळवारी मध्यरात्रीच्या नंतर व नववर्षाच्या रात्री 3 वाजेच्या दरम्यान शहरातील ताकडगाव रोडवर चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. ताकडगाव रोडवरील श्री समर्थ पार्क येथील अशोकराव गोंडे यांच्या घराचे गेट तोडून आतमधील दुचाकी पळवली. तसेच त्यांच्या घराला बाहेरून लाँक करुन चोरट्यांनी शेजारील तलाठी संजय पाखरे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही.

यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरुन लाँक करुन चोरट्यांनी बाजूच्या मातोश्री पार्कमध्ये मोर्चा वळवून त्याठिकाणी कृष्णा मधुरे यांच्या घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील काही रोख रक्कम व काही बेंटेक्स दागिने, नवीन काही साड्या, देव घरातील देवाच्या मूर्ती असा जवळपास 20 हजारांचा ऐवज चोरुन बाजूलाच असलेल्या राज राठोड यांच्या घरासमोरील मोटारसायकल चोरण्याच्या प्रयत्नात चोरटे असतानाच त्याठिकाणी राज राठोड यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे याठिकाणाहून चोरट्यांनी धुम ठोकली.

यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पेट्रोलिंगची गाडी याठिकाणी आली होती. याप्रकरणी अशोकराव गोंडे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरट्यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच चोरीच्या घटनेची सलामी दिल्याने नागरिक भयभीत झाले असून पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news