

Farmers are not receiving solar pumps even after paying the money.
मनोज गव्हाणे
नेकनूर, पुढारी वृत्तसेवा रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी दिवस रात्र राबत ठेवणारा यातून रात्रीचा ताण वाचवण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाच्या सोलार पंप योजनेचा फायदा घेण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र वर्षभरानंतरही काही कंपन्या शेतकऱ्यांना पैसे घेऊन सोलार देण्यात अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांना यावर्षीही हंगामात विजेच्या लपंडावाचा सामना करत थंडीत जागरण करीत पिकांना जगवण्याचा आटापिटा करावा लागत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या सोलर कंपन्यांना शासनाने दंड करावा अशी मागणी नेकनूरमधील शेतकऱ्यांनी केली आहे.
रब्बीच्या हंगामात पिकांना पाणी देण्याची गरज असते यावेळी अनेकदा विजेच्या समस्या उद्भवून महिना - महिना शेतकऱ्यांना विजेला मुकावे लागते यामुळे पिकांचे नुकसान होते. यासाठी पर्याय म्हणून मागच्या दोन वर्षात सोलार पंप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले रात्रीचे जागरण वाचणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाचे ठरलेले कोटेशन भरून कंपन्या निवडत सोलारची मागणी केली. काही ठिकाणी सहा महिन्यातच पंप मिळाले तर काहींना वर्ष लोटले तरी प्रतिक्षा कायम आहे.
या शेतकऱ्यांनी वारंवार संबंधित कंपनीकडे संपर्क करीत विनंती, अर्ज केले तात्पुरता दिलासा देऊन अनेकांना पंप बसवण्यासाठी खड्डे खोदायलाही लावले मात्र अजूनही या शेतकऱ्यांना पंप मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत संताप वाढला आहे. ऐन पाणी देण्याच्या हंगामातच पंप नसेल तर पुन्हा काय उपयोगाचा ही भावना शेतकऱ्यांतुन व्यक्त होत आहे. थंडी, विजेचा लपंडाव आणि बिबट्याची दहशत यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
कोटेशन भरले तरीही सोलार मिळेना
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच बत्तीस हजार पाचशे रुपये सोलर पंपसाठी भरले मात्र शक्ती नावाच्या कंपनीने अजूनही सोलर दिलेले नाही. मागच्या महिन्यात संपर्क केला असता खड्डे खोदा पंधरा दिवसांत बसवू म्हणून सांगण्यात आले, मात्र अजून बसवला नाही शिवाय आता तर संबंधित कंपनीचा कर्मचारी फोनही उचलत नसल्याने रात्रीचे जागरण आणि थंडी याला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने अशा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि ताबडतोब सोलर द्यावे अशी मागणी शेतकरी संजय शिंदे यांनी केली.