Beed crime: आठवडी बाजारात जनावरांची वाहने अडविणारे पोलिसांच्या ताब्यात; गोरक्षक असल्याचे भासवून वाहने अडवित असल्याची माहिती
गौतम बचुटे
केज : राष्ट्रीय महामार्गावर दोन युवक हे गोरक्षक असल्याचे भासवून आठवडी बाजारातून जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवून व्यापारी आणि वाहनचालकांना दमदाटी करीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दर गुरुवारी बीड जिल्ह्यातील साळेगाव (ता.केज) येथे जनावरांचा आठवडी बाजार भरत असतो. २५ सप्टेंबर गुरुवारी धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील व्यापारी समीर रज्जाक कोतवाल हे बाजारात जनावरांची खरेदी करून येडशीकडे जात असताना त्यांना माळेगांव येथील शिवाजी चौकात दोन युवकांनी त्यांचा टेम्पो अडविला आणि त्यांना दमदाटी करून ते गोरक्षक असल्याचे सांगितले. नंतर समीर कोतवाल जनावरासह टेम्पो पुन्हा परत साळेगाव येथील बाजारात घेऊन आले. त्याच्या वाहनात बसून ते दोन युवक देखील साळेगावच्या बाजार आले.
दरम्यान ही माहिती केज पोलिसांना कळविताचा बिट जमादार, बाबासाहेब बांगर हे साळेगाव येथे आले. परंतु टेम्पो अडविण्याची घटना ही युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने युसुफ वडगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल कारले आणि पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण हे सरकारी वाहनाने साळेगाव येथे हजर झाले. युसुफवडगाव पोलिसांनी वाहने अडविणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन व्यापारी समीर कोतवाल याला सोबत घेऊन युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात घेऊन गेले.
अद्याप गुन्हा दाखल नाही
युसुफवडगाव पोलिसांकडे चौकशी केली असता अद्याप या प्रकरणी कोणी फिर्याद दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी दिली आहे.
'ते' दोन युवक कोण ?
जनावरांच्या टेम्पो सह ते दोन युवक पुन्हा बाजारात आल्या नंतर त्यांचा संशय आल्याने बाजारात व्यापारी आणि शेतकरी यांनी त्यांना मारहाण केल्याची चर्चा सुरू आहे.
'त्या' दोघांनी ओळख ठेवली लपवून
उपसरपंच गणेश गालफाडे आणि राजेंद्र तिडके यांनी त्या दोन युवकानं त्यांची नावे आणि ओळखपत्र याची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सांगितली नाहीत किंवा ओळखपत्र सुद्धा दाखविली नाहीत. वाहने अडवून गोरक्षक असल्याचे सांगत असलेल्या दोघा पैकी एकाचे नाव केशव रत्नपारखी (रा. बीड) आणि दुसऱ्याचे नाव पाळवदे ( पूर्ण नाव समजू शकलेले नाही) (रा.सासूरा ता. केज) असे असल्याचे समजते.

