

गेवराई : न्याहारीसाठी घरात जात असताना राहत्या घराची भिंत अंगावर कोसळ्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास घडली. नजीर कट्टू पठाण (वय ७०, रा.ढालेगाव ता.गेवराई) असे मृताचे नाव आहे.
गेवराईत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पडझडीच्या घटना देखील घडल्या आहेत. तालुक्यातील ढालेगाव येथील नजीर पठाण हे बुधवारी सकाळी गावात फेरफटका मारून घरात न्याहारीसाठी होते. ते आपल्या घराजवळ आले असता जीर्ण झालेली त्यांच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. भिंतीखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ढालेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.