

Kej Taluka elderly couple attacked
केज : केज तालुक्यातील एका गावात शेजारील जमीन विकण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मागासवर्गीय समाजातील वृद्ध दांपत्याला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील लाडेगाव येथील गणपती सैन्नाप्पा कांबळे (वय ७५) यांच्या नावावर लाडेगाव शिवारातील गट क्रमांक १२६ मध्ये २७ गुंठे शेतजमीन आहे.दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गणपती कांबळे हे शेतातील मोटार सुरू करण्यासाठी पायी जात असताना त्यांच्या शेजारील जमीनधारक धनराज नरसु अंबाड, दत्ता ऊर्फ धर्मराज भानुदास शितोळे, प्रदीप संपत्ती अंबाड व सुरेखा डिगाबर मुळे यांनी संगनमत करून त्यांना अडवले. यावेळी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत जमीन विकून टाकण्याची मागणी केली व नकार दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, दत्ता ऊर्फ धर्मराज शितोळे याने लोखंडी गजाने गणपती कांबळे यांच्या डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले, तर प्रदीप अंबाड याने पाठीमागून डोक्यावर लाकडी काठीने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी त्यांची पत्नी भामाबाई कांबळे मध्ये पडली असता, सुरेखा डिगाबर मुळे हिने तिच्या केसांना धरून खाली पाडत लाथांनी मारहाण केली.
या प्रकरणी गणपती कांबळे यांनी दि. १ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात धनराज अंबाड, दत्ता ऊर्फ धर्मराज शितोळे, प्रदीप अंबाड व सुरेखा मुळे या चौघांविरोधात गुन्हा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.