बीड : बीड येथील सुरेश कुटे यांच्या कुटे ग्रुपची तब्बल एक हजार कोटी रुपयांची मालमता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबई, संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यातील मालमत्तेचा समावेश आहे. कुटे यांनी ज्ञानराधा पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास चार लाख ठेवीदारांची फसवणूक केल्याचे देखील ईडीच्या तपासात समोर आले आहे.
बीड येथील ज्ञानराधा पतसंस्था व विरुमला उद्योग समुहाच्या माध्यमातून सुरेश कुटे यांनी राज्यभरात जाळे विस्तारले होते. या दरम्यान कुटे ग्रुप अंतर्गत सुरु असलेल्या उद्योगांवर आयकर विभागाच्या धाडी गतवर्षी पडल्या होत्या. यानंतर ज्ञानराधा पतसंस्थेच्या बाहेर ठेवीदारांच्या रांगा लागल्या आणि पतसंस्थेच्या शाखांना टाळे लागू लागले.
यानंतर कुटे यांनी एका परदेशी कंपनीशी आपले टायअप होणार असून लवकरच साडेचार हजार कोटी मिळणार असल्याचे आश्वासन ठेवीदारांना दिले, परंतु ते हवेतच विरले, ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने गुन्हे दाखल होत गेले.
तब्बल पस्तीस गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरेश कुटे यांना अटक केली. सध्या ते जेलमध्ये आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात ईडीने एंट्री करत तपास केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ईडीने सुरेश कुटे यांची १ हार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून कुटे यांनी अवैधरित्या २ हजार ३१८ कोटीची रक्कम विविध कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या कुटे ग्रुपकडे वळवल्याचे देखील समोर आले आहे.
यामध्ये काही बँकेच्या माध्यमातून तर काही रोख स्वरुपातील रकमेचा समावेश आहे. यापुढील कार्यवाही देखील सुरु असून यातून आणखी काय काय बाबी समोर येतात, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.