

परळी वैजनाथ : पुढारी वृत्तसेवा
परळी वैजनाथ तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तालुक्यातील मौजे गोपीनाथ गडचा (पांगरी) डॉ. अक्षय संभाजी मुंडे याने अतिशय प्रतिष्ठेच्या संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून भारतात 699 वी रँक मिळवली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या अक्षय मुंडे याच्या यशाबद्दल पांगरी - गोपीनाथगड येथे तोफांची सलामी देत, फटाक्यांची आतषबाजी करून ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. आईने घेतलेल्या कष्टाचे चीज करून दाखवत डॉक्टर अक्षय मुंडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
डॉ. अक्षय संभाजी मुंडे याचे लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले, मात्र त्याची आई श्रीमती इंदुबाई मुंडे यांनी मोलमजुरी करून अक्षय याला शिक्षण दिले. प्राथमिक शिक्षण भगवान बाबा विद्यालय, माध्यमिक शिक्षण परळीच्या न्यू हायस्कूल येथे घेतले, तर लातूरच्या एम.आय.टी. कॉलेजमधुन BDS चे शिक्षण घेउन तो दातांचा डॉक्टर झाला. आईने अतिशय कष्ट करून आपल्याला शिकवले आहे याची जाणीव ठेवत अक्षय मुंडे यांनी यापेक्षाही मोठे शिक्षण घेण्याच्या निर्धार करून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अक्षयच्या मेहनतीला आणि आईच्या कष्टाला अखेर यूपीएससी या प्रतिष्ठेच्या परीक्षेत घवघवीत यशरुपी फळ मिळाले.
डॉ. अक्षय मुंडे यांचे वडील लहानपणी देवाघरी गेले. त्यांची आई इंदुबाई मुंडे या खचून गेल्या. पण त्यांनी कंबर कसली आणि जिद्दीने अक्षय मुंडे यांना शिकण्याचा निर्धार केला. अल्पभूधारक असलेल्या इंदुबाई मुंडे यांनी स्वतःच्या शेताबरोबरच इतरांच्या शेतात मजुरी केली, पण अक्षयला शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही. अक्षय मुंडे यांनीही आईच्या मेहनतीला आणि कष्टाला न्याय देण्यासाठी जिवाचे रान केले. रात्रंदिवस अभ्यास करून आईचे स्वप्न पूर्ण केले.
मंगळवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि परळी तालुक्यातील गोपीनाथ गड (पांगरी) च्या डॉ. अक्षय मुंडेचे नाव यूपीएससीचीच्या यादीत झळकले. आईने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने अक्षयने प्रचंड मेहनत घेत हे यश संपादन केले. वास्तविक अक्षयच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची. त्यात वडिलांचे छत्र बालपणीच हरवलेले... अशा प्रतिकुल परिस्थितीत परळी तालुक्यातील गोपीनाथ गड (पांगरी) चा अक्षय संभाजी मुंडे हा गावातील भगवानबाबा विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने परळीच्या न्यू हायस्कूल व उच्च मा.विद्यालय येथे प्रवेश घेतला. २०१२ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने लातूर येथील एमआयटी कॉलेजमध्ये बीडीएससाठी प्रवेश घेतला.
बीडीएस ही वैद्यकीय शाखेची पदवी घेऊन तो डॉक्टर झाला. पण त्याचे मन या क्षेत्रात रमत नव्हते. आपण काहीतरी वेगळे करून दाखवावे ही भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या आईने आपल्यासाठी जे कष्ट उपसले, त्या कष्टांचं चीज करायचं असेल तर आपण याहीपेक्षा एखादे मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विचाराने त्याने थेट पुणे गाठले. तेथे जाऊन त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. पुणे येथून दोन वर्षांपूर्वी तो नवी दिल्ली येथे गेला व स्पर्धा परीक्षांसाठी त्या ठिकाणी योग्य असे मार्गदर्शन मिळवत त्याने प्रचंड मेहनत सुरू केली.
डॉ. अक्षयला अक्षता नावाची एक विवाहित बहीण असून त्याची आई आजही शेतामध्ये काम करते. पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट अशा परिस्थितीत त्या माऊलीने अक्षयला शिक्षणासाठी लातूर असो, पुणे असो की दिल्ली असो कुठेही मागे वळून पाहू दिले नाही.
आईचे प्रचंड कष्ट, बहिणीची साथ आणि त्या दोघींनी त्याच्यासाठीसाठी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अक्षयने दिवस रात्र एक केले. अभ्यासाव्यतिरिक्त त्याने बाकी सर्व अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवल्या आणि त्यामुळेच मुंडे कुटुंबाला आणि पांगरी गावाला आजचा हा भाग्याचा दिवस पाहण्याचा योग आला.
देशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या यूपीएससीच्या परीक्षेत त्याने 699 वी रँक मिळवत विजयाची माळ खेचून आणली. त्याच्या ह्या उत्तुंग यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार, गावकरी, नातेवाईक,तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद या सर्वांनी मनापासून आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.