

District Collector takes disciplinary action against those who neglected their duties in the revenue department in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा बीड जिल्ह्यात महसूल विभागात कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी थेट शिस्तभंगाची कारवाई करताच विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. केवळ एका आठवड्यात जिल्ह्यातील चार महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असून यामुळे कर्मचारी वर्गात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत गेवराई तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी अभिजीत मधुकर दहीवाळ आणि महसुली सहाय्यक जयश्री नारायण वाका यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
गेवराई तहसील कार्यालयातील एका महत्त्वाच्या प्रकरणाची माहिती ईडीपी प्रणालीवर अपलोड करताना झालेल्या त्रुटीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ही जबाबदारी दहीवाळ यांच्यावर निश्चित करण्यात आली. याबाबत शासनाने थेट चौकशीचे आदेश देत संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली. चौकशी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून स्पष्टीकरण न आल्यास पुढील कारवाई अनिवार्य होणार.
कर्तव्यावर असताना काही चुका कर्मचाऱ्यांकडून होऊ शकतात. त्यावर त्यांच्याकडून खुलासा घेणे गरजेचे असते. जर संबंधित कर्मचाऱ्याकडून समाधानकारक खुलासा आला नाही तर त्यावर कारवाई झाल्यास कोणाची तक्रार असण्याची तक्रार नाही.
परंतु कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून न घेताच किंवा किरकोळ चुकासाठी मोठी शिक्षा दिली जात असेल तर हे चुकीचे असल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात असून या सर्व प्रकारच्या विरोधात कर्मचारी संघटना देखील आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी जॉन्सन यांच्या कारवाईमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, कारवाईमुळे विलंब न करता कामे वेळेत पूर्ण करण्याचा संदेश संपूर्ण विभागात पोहोचला आहे. सर्वसामान्य जनतेकडून या कारवाईचे स्वागत होत आहे, कारण यामुळे शासकीय कामकाजात शिस्त व गती येण्यास हातभार लागणार आहे.