

मनोज गव्हाणे
नेकनुर : जिल्ह्यातील काही महाविद्यालये 20 ते 30 हजार मोजले की वर्षभर कॉलेजमध्ये न जाता पास करून देण्याची हमी उचलत असल्याने ते दूरवर लोकप्रिय झाले. त्यामुळेच मागच्या काही वर्षात परीक्षेसाठी खेड्याकडे चला हा पॅटर्न मोठ्या प्रमाणात नावारूपास आला होता.
मात्र यावर्षी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कॉपीमुक्तीचा नारा देत असे परीक्षा केंद्र रडारवर ठेवत सीसीटीव्हीचा वॉच दिला. यामुळेच बारावीच्या परीक्षेत पहिल्या पेपरपासूनच विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यातच चौसाळ्यातील कालची परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यावरची कारवाई गुत्तेदारी करणाऱ्या सेंटरच्या तोंडच पाणी पळवणारी ठरली आहे.
बारावी आणि दहावी या बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील काही ठराविक परीक्षा केंद्र कॉप्यामुळे दूरवर प्रसिद्ध झाले आहेत. खेड्याकडे चला हा पॅटर्न रुजला अशा ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी भाव ठरलेला असायचा तो पाच आकड्यातील होता जसे येतील तसे या गुत्तेदारीत समाविष्ट केले जायचे. यामुळे वर्षभर या महाविद्यालयाकडे न फिरकता चांगल्या मार्काने उत्तीर्ण होण्याची कला अनेकांनी साधली.
यावर्षी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक भूमिकेने यावर पाणी पडल्याचे पायाला मिळत असून पहिल्या दिवशी स्वतः जिल्हाधिकारी बीडच्या परीक्षा केंद्रावर धडकले आणि कॉपीमुक्तीला हवा दिली. चौसाळ्यातील परीक्षा केंद्रावर पहिल्याच पेपरला ड्रोनच्या साह्याने शिक्षण विभागाने लक्ष घातले आणि अशा महाविद्यालयांचे भिंग फोडले त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दणका बसला. जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने17 कर्मचाऱ्यावर नेकनूर ठाण्यात गुन्हे दाखल झाले त्यामुळे आता उर्वरित गुत्तेदारी करणाऱ्या महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहेत.
मागच्या पंधरा वर्षात प्रथमच कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यशस्वी ठरल्याची नोंद त्यांच्या नावावर होईल पोलिस अधीक्षक धिवरे पॅटर्ननंतर जिल्हाधिकारी जॉन्सन पॅटर्न कॉपी मुक्तीसाठी प्रभावी ठरत आहे. यामुळे आता शहरात क्लास आणि ग्रामीण भागात प्रवेश याला ब्रेक लागला जाईल.