

Discussion to erect a midnight statue in Gevrai-Neknur
गेवराई / नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील गेवराई शहर आणि नेकनूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे मध्यरात्रीच्या सुमारास उभारण्यात आल्याने जिल्हाभरात उत्साहासोबतच चर्चेला उधाण आले आहे. शिवप्रेमींनी जल्लोषात पुतळ्यांचे स्वागत केले असले, तरी प्रशासनिक परवानग्या, कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेवराई शहराच्या मध्यवर्ती छत्रपती चौकात भव्य अश्वारूढ पुतळा क्रेनच्या सहाय्याने स्थापित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि भगव्या पताकांच्या लहरीत नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत चौकात गर्दी केली.
सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची वर्दळ कायम होती. अनेक मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, नेकनूर येथेही शिवप्रेमींनी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या शिवस्मारकाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पहाटेच्या सुमारास अश्वारूढ पुतळा उभारला. सकाळी पुतळ्याभोवती स्वच्छता मोहीम राबवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या दोन्ही घटनांमुळे 'मध्यरात्री पुतळा उभारणी' ही पद्धत जिल्ह्यात नव्याने रुजू होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच बुलढाणा जिल्हा येथे अशाच प्रकारावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यात भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या मते, अशा उभारण्या भावनिक असल्या तरी आवश्यक त्या प्रशासनिक परवानग्या, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांचा विचार होणे गरजेचे आहे. घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा पूर्वतयारी महत्त्वाची, अशी प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.
पोलिस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नसली, तरी अशा घटनांकडे अत्यंत संवेदनशीलतेने व कायद्याच्या चौकटीतून पाहणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. पुतळ्यांच्या सुशोभीकरण, परिसर विकास आणि अधिकृत उद्घाटनाबाबत प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्यरात्री पुतळा उभारणी' नव्या पद्धतीवर सर्वत्र चर्चा
बीड जिल्ह्यात अलीकडे मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास पुतळे उभारण्याच्या घटनांनी लक्ष वेधले आहे. समर्थकांच्या मते, दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना गती देण्यासाठी हा मार्ग अवलंबला जातो; तर विरोधकांच्या मते, अशा कृतींमुळे कायदेशीर प्रक्रिया, परवानग्या आणि सुरक्षा नियमांवर प्रश्न निर्माण होतात. जाणकारांच्या मतानुसार, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारणीसाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी, स्थानिक स्वराज्य संस्थांची मान्यता, वाहतूक व सुरक्षा आराखडा या बाबी अत्यावश्यक असतात. भावना महत्त्वाच्या असल्या तरी कायद्याची चौकट तितकीच महत्त्वाची, अशी संतुलित प्रतिक्रिया काही नागरिकांनी नोंदवली.