Beed news : दिंद्रुड परिसरातील बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

अंतरमशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त
Beed news : दिंद्रुड परिसरातील बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा
Published on: 
Updated on: 

दिंद्रुड : आषाढ महिना अर्ध्यावर आला तरीही दिंद्रुड आणि परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या तुरळक रिमझिम पावसावरच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. मात्र आहे ते पीक वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड सुरु असून परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, दिंद्रुड आणि परिसरात कापूस व सोयाबीन हे मुख्य पीक तर मूग, उडीद आणि बाजरी आदी खरीप पिके घेतली जातात. रिमझिम पावसामुळे जमिनीत काहीसा ओलावा तयार झाला आणि शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. काहींना तर दुबार पेरणी करावी लागली, परंतु गेल्या 2 आठवड्यांपासून दमदार पाऊस न झाल्याने उगवलेल्या कोवळ्या रोपांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. हवामान विभागाने ढगाळ हवामान आणि तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र आभाळ भरून येत आहे मात्र पाऊस काही पडत नाही अशी परिस्थिती आहे.

पुरेसा पाऊस नसला तरी हाताशी आलेल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतर मशागतीची कामे सुरू केली आहेत. तण वाढू नये आणि जमिनीतील ओलावा टिकून राहावा म्हणून सोयाबीन आणि कडधान्य पिकांमध्ये कोळपणी केली जात आहे. तसेच काही शेतकरी कीड नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक व जिवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करून पिक तग धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे दिंद्रुड परिसरातील शेतकरी सध्या आलेला घास वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.

यावर्षी सुरुवातीपासूनच वरुणराजाने आमच्यावर अवकृपा दाखवली आहे. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर पेरणी केली पण अद्याप समाधानकारक पाऊस नाही. आता जे उगवून आलंय ते जगवायचं आहे. पाऊस पडेल या आशेवर अंतर मशागत करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही.

- गोपाळ खांडेकर (शेतकरी,दिंद्रुड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news