

धारूर :धारूर शहरासह तालुक्यात धनगर समाजातील अनेक कुटुंबांची उपजीविका शेळी-मेंढीपालन वर अवलंबून आहे. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने डोंगर परिसरातील नैसर्गिक चारा उपलब्ध झालेला नाही. त्यातच पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेळी-मेंढीपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने तातडीने शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायके यांनी केली आहे.
पावसाळ्यात डोंगर भागात मोठ्या प्रमाणात गवत व इतर नैसर्गिक चारा उपलब्ध होत असल्याने मेंढपाळांना आपल्या जनावरांच्या चाऱ्याची फारशी अडचण भासत नाही. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अपेक्षित प्रमाणात गवत उगवले नाही. त्यामुळे शेळी-मेंढ्यांसाठी चारा मिळविण्यासाठी मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे.
शेळी-मेंढीपालन हा अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार आहे. मात्र, सध्या चारा आणि पाण्यासाठी होणारा खर्च वाढल्याने या व्यवसायावर मोठा आर्थिक ताण आला आहे. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असताना जनावरांना चारा कुठून आणायचा आणि पाणी कुठून उपलब्ध करून द्यायचे, असा प्रश्न मेंढपाळांसमोर निर्माण झाला आहे. चारा-पाण्याच्या शोधात जनावरांसह स्थलांतर करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने शेळी-मेंढीपालकांसाठी स्वतंत्रपणे चारा उपलब्ध करून द्यावा. तसेच ज्या भागात पाण्याची उपलब्धता नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे अथवा अन्य माध्यमातून जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. शासनाने या प्रश्नाकडे केवळ पशुधनाचा प्रश्न म्हणून न पाहता हजारो मेंढपाळ कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न म्हणून गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
शेळी-मेंढीपालकांच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन चारा व पाण्याची व्यवस्था न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष गायके यांनी दिला आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन मेंढपाळांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.