

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करूणा शर्मा मुंडे (Karuna Sharma) यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलासा दिला. करूणा मुंडेंना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुरु झालेल्या चर्चेवर करुणा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशिव मुंडे याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट करत आपली भूमिका मांडली असून त्याने आपल्या वडिलांची बाजू घेतल्याचे दिसून आले आहे.
करुणा आणि धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने पोस्ट टाकून खालीलप्रमाणे खुलासा केला आहे.
''मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे. कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे. माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची.
जो घरगुती हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते, तो घरगुती हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण आणि माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा.
माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला आणि माझ्या बहिणीलासुद्धा घर सोडून जायला सांगितले. कारण तिच्या मते तिचा आणि आमचा (जन्मदाती आई असूनही) काहीही संबंध राहिला नव्हता.
२०२० या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीतय तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही, असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवते.''
-शिशिव धनंजय मुंडे
दरम्यान, यावर करुणा शर्मा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''धनंजय मुंडे मुलावर दबाव टाकत होते. आमच्यावरही तोंड बंद ठेवण्यासाठी दबाव टाकला. धनंजय मुंडे यांचा मुलाला सतत फोन येत होता. मी मुलासाठी काय वाईट केले?.'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझी काही चूक नसताना फरफट झाली. ५० वेळा कोणती महिला रडू शकतो का? १९९८ पासून आम्ही सोबत असल्याचे धनंजय मुंडे यांनी मान्य केले, असेही त्या म्हणाल्या. धनंजय मुडेंचे मंत्रिपद जायला हवे. मुंडेंशिवाय अजितदादांच्या पोटातले पाणी हालत नाही. गुंडगिरीमुळे त्यांचे मंत्रिपद आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.