

बीड : विलास घुले खून प्रकरणातील नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे, परंतु दहावा आरोपी अद्यापही बाहेर आहे. तो आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? बाहेर राहून त्याने साक्षीदारांवर दबाव व पुरावे नष्ट करण्याचे काम केले, तर त्याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मुंडे यांनी शुक्रवारी सायंकाळी विलास घुले यांच्या कुटुंबीयांची टाकळी येथे भेट घेतली.
खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करा अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान केली होती. यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी घुले कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. यावेळी विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी तपासाबाबत व सर्व परिस्थितीबाबत त्यांना माहिती दिली,
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, उमेश माने या तरुणाला मारण्यासाठी काही लोक आले होते त्याला वाचवताना विलास घुले या तरुणाला जीवे मारण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे परंतु एका आरोपीला अटक झालेली नाही. तो आरोपी मोठ्याच लेकरू आहे म्हणून अटक होत नाही का ? पोलिसांवर आमचा संशय आहे. या प्रकरणात त्या आरोपीला पोलिसांना बाहेर काढायचा आहे का? आमचा कोणाचेही या ठिकाणी वैयक्तिक वाद नाही परंतु घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले.