परळी वैजनाथ : माझे वडील गेल्यानंतर मला वडील नसल्याची उणीव अजित दादांनी कधीही भासू दिली नाही. माझ्या चांगल्या आणि वाईट काळात सुद्धा अजितदादाच वडील, त्यांचा हात माझ्या पाठीवर होता. अजित दादांचे आणि माझे नाते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही असे बोलत असताना धनंजय मुंडे हे भावना विवश होऊन त्यांना रडू कोसळले.
आज सकाळी विमान अपघातात अजित दादा हे जखमी झाले असे प्राथमिक वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामतीसाठी रवाना झाले. दरम्यान काही अंतरावर पोहोचताच अजित पवार यांचे या दुर्दैवी अपघातात निधन झाल्याचे दुःखद वृत्त कानी पडले आणि धनंजय मुंडे अक्षरशः ढसाढसा रडायला लागले.
संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता अशी दादांची ओळख, त्यातच वेळेचे नियोजन आणि शिस्त, प्रश्नावरील मजबूत पकड यामधून विकासाचा एक वेगळा दरारा उभे करणारे नेतृत्व म्हणून सबंध महाराष्ट्राला ओळख असलेले अजित दादांचे हरहुन्नरी नेतृत्व होते. आज त्यांच्या अखाली निधनाने ते संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दुःखाच्या छायेत लुटून गेले असल्याची अत्यंत भावनिक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
अजित दादांचे अशाप्रकारे अपघाती निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी असून, माझे संबंध अस्तित्व हे दादांच्या जीवावर होते त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि ते म्हणतील की धनंजय वेळेवर ये बर का, त्यामुळे दादांच्या बाबतीत श्रद्धांजली हे शब्दच फुटत नसल्याची भावना व्यवस प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अजितदादांची ही अकाली एक्झिट सबंध राज्याला चटका लावून गेली असून दादांचे अकाली जाणे ही देशाची, राज्याची, पक्षाची तसेच बीड जिल्ह्याची व माझी व्यक्तिगत कधीही न भरून निघणारी हानी आहे, आहे असे धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले.
मागील सुमारे एक वर्षापासून अजित दादा आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात सी आय आय आय टी, विमानतळ असे मोठे प्रकल्प मार्गी लागले तर दुसरीकडे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहांना निधी मिळाला. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एका आर्थिक वर्षात १३०० पेक्षा अधिक विकास कामे एका दिवशी सुरू झाली. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला एक मोठी व कणखर दिशा मिळाली होती. मात्र हा जिल्हा शापित आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो.