

Despite the ban on gutkha, storage and transportation continue!
परळी वैजनाथ/नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि साठवणुकीचे रॅकेट सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. केवळ २४ तासांच्या आत परळी व नेकनूर परिसरात पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे २५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. परळी येथून एक इसम अटकेत असून, नेकनूर येथील आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत.
पाच लाखांचा गुटखा जप्त परळी : स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) कारवाईत परळी तालुक्यातील उजनी पाटी येथे प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई २३ जुलै २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता करण्यात आली असून आरोपीचे नाव बालाजी सौदागर फड (वय २५, रा. धर्मापुरी, ता. परळी) असे आहे. त्याच्याकडून ५,३४,००० किमतीचा गुटखा व पानमसाला हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्यासह जप्त मुद्देमाल बर्दापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र केकान, नाईक पो. कॉ. गोविंद भताने, पो. कॉ. सचिन आंधळे यांनी ही कामगिरी केली.
दोन वाहनांतून २०.७१ लाखांचा गुटखा जप्त, तर आरोपी फरार नेकनूर २४ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता, नेकनूर परिसरातील धुळे-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिकअप व स्विफ्ट कारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही वाहने थांबवण्याचा प्रयत्न करताच स्विफ्ट कार (चक ०१ इढ ६१४४) पिकअपला येऊन आदळली आणि या गोंधळात दोन्ही वाहनांतील गुटखा व्यापारी पळून जाण्यात यशस्वी ठरले.
वाहनांची झडती घेतली असता 'बाबा', 'विमल', 'रजनीगंधा' यांसारख्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. ज्याची किंमत २०,७१,०००/- (वीस लाख एकाहत्तर हजार रुपये) ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, पो. कॉ. गोविंद राख, बाळासाहेब ढाकणे, शहजादे यांनी संयुक्तरीत्या केली.
राज्यात गुटखा विक्री आणि साठवणुकीवर बंदी असतानाही, बीड जिल्ह्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात तस्करीचे प्रकार उघड होत आहेत. हे प्रकरण फक्त एखाद्या स्थानिक तस्कर पुरते मर्यादित नसून, संघटित गुटखामाफियांचे रॅकेटचे असण्याची शक्यता पोलिसांना असून त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे, विशेष म्हणजे, या दोन्ही प्रकरणांतील गुटखा वेगवेगळ्या भागातून एकाच पद्धतीने वाहतूक होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यांत जाळे पसरल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान या कारवायांमुळे गुरखा तस्करी करणाऱ्या टोळ्यांना मोठा झटका बसला असून पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके नेमण्यात आली असून, आणखी धाडी पडण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.