.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
माजलगाव : पुढारी वृत्तसेवा : लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी केली. माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेच्या सभेत अजित पवार बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, जयसिंग सोळंके यांची उपस्थिती होती.
महायुतीमध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीचीच असणार आहे. याठिकाणी जनतेच्या मनातील उमेदवार आहे तोच उमेदवार देणार असून लाडक्या बहिणींना रक्षाबंधानाला ओवाळणी दिली, त्या पध्दतीनेच दिवाळीला भाऊबीजेला दोन महिन्यांची एकत्रित ओवाळणी दिली जाईल, असे ते म्हणाले. महायुती शासनाने सर्वसामान्यांसाठी आणलेल्या विविध शासकीय योजना व त्यांची केलेली अंमलबजावणी यांची माहिती देत शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, मागेल त्याला सोलार योजना, शेतकऱ्यांना दिलेले वेगवेगळे अनुदान या सर्व गोष्टींचा त्यांनी उहापोह केला.
मराठा आरक्षण ओबीसीतून देण्याची मागणी समाजबांधवांची आहे. त्यामुळे ओबीसीतील इतर बांधवांना त्याची अडचण होणार नाही, याचा अभ्यास करूनच आरक्षण देण्यासाठी महायुती शासन प्रयत्नशील आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली येथे विमानतळ नसून बीड येथे विमानतळ देणारे विमानतळ झाल्यास उद्योजक विमानाने येतील आणि एमआयडीसी व उद्योगाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.