

Crowd of devotees for the darshan of Goddess Ambachondi
धारूर, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या डोंगररांगांच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात श्री अंबाचोंडी माता मंदिर वसलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या श्रद्धास्थानाला नवरात्रोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. डोंगर-दऱ्यांच्या सान्निध्यात वसलेल्या या देवस्थानामुळे धारूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे.
नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेतही या परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन दगडी बांधकाम, सभोवतालच्या उंच डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरण यांमुळे मंदिर परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन, पूजाअर्चा आणि नवसपूर्तीसाठी भाविकांची रेलचेल असते.
दसऱ्याच्या काळातही मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जातो. अंबाचोंडी मातेची महती धारूर तालुक्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रातील विविध भागांत पोहोचली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अंबाचोंडी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे धारूरच्या धार्मिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
मंदिराच्या रस्त्यावरील खड्डे बुजवले
किल्लेधारूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबाचोंडी माता मंदिरावर परिसरातील हजारो भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक वर्षापासून दुरवस्था झाल्याने भाविकांसह प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर धारूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विजयसिंह उदयसिंह दिख्खत यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवून भाविकांना दिलासा दिला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन उद्योजक विजयसिंह दिख्खत यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले.
त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे सध्या मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना आणि वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक सुविधेचा प्रश्न केवळ प्रशासनावर न सोडता सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेता येतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.