

Chakkajam protest on July 24 in Vadwani
वडवणी, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार व श्रमिकांच्या विविध १७ मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला वडवणी तालुक्यातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शवला असून २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वडवणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबतचे निवेदन वडवणी तहसीलदारांना देण्यात आले असून, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाची जोरदार तयारी दर्शवली. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह ऊस-दुधाला योग्य दर, दिव्यांगांना वाढीव मानधन, आणि इतर १७ मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनात शिवसेना (उबाठा गट) तालुकाप्रमुख विनायक मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य पती औदुंबर सावंत, नगराध्यक्ष पती शेषेराव जगताप, मराठा समाज-सेवक संतोष डावकर, युवराज शिंदे, विश्वास आगे, सुग्रीव मुंडे, दत्तात्रय जमाले, अंकुश नाईकवाडे, बबन मांजरे, संकेत लंगडे, हरीश बादाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वडवणीतील या आंदोलनामुळे प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.