

बीड, पुढारी वृत्तसेवा : घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांची गाडी आपल्याच मागावर असल्याचा संशय गांजा वाहतूक करणार्यांना आला. यामुळे त्यांनी भरधाव वेगात ही गाडी पळवली, परिणामी काही अंतरावर जाताच या गाडीला अपघात झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता या गाडीत तब्बल 21 लाख रुपयांचा गांजा मिळून आला.
बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेची टीम घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असतांना मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मारुती कार वेगाने राजुरीकडून खालापुरीकडे जाताना दिसली. त्यानंतर काही वेळातच मौजे हनुमान वस्ती (ता.बीड) येथे एका कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोउपनि श्रीराम खटावकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले.
पाहणी केली असता कारमध्ये 5 गोण्या गांजा आढळून आला. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थागुशाचे पोनि बंटेवाड, पो.नि. खेडकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये एकूण 105 किलो 750 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे (रा.चांदा ता.नेवासा जि.अहिल्यानगर) व दत्तु मुरलीधर सकट (रा.टाकळी खंडेश्वरी ता.कर्जत जि.अहिल्यानगर) यांना गांजा विषयी विचारले असता त्यांनी तो चांदा येथून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला असून आरोपी दत्तु मुरलीधर सकट यास न्यायालयाने 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी बाळकृष्ण हनपुडे, पो.नि.शिवाजी बंटेवाड, पो.नि. मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, पोउपनि श्रीराम खटावकर, पो.ह. सोमनाथ गायकवाड, अनंत मस्के, राहुल शिंदे, मनोज जागेदंड, सतीश मुंडे, संभाजी खिल्लारे, अशफाक सय्यद, अर्जुन यादव, अंकुश वरपे, मनोज परझणे, नितीन वडमारे, सिध्दार्थ मांजरे यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि बाळराजे दराडे हे करत आहेत.
भरधाव वेगात जाणार्या गाडीमधून गांजा वाहतूक होत असली तरी त्याबाबत पोलिसांना कल्पना नव्हती. परंतु गाडीतील दोघांनाही पोलिस आपल्याच मागावर असावेत असा संशय आल्याने त्यांनी जवळपास दीडशे किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी चालवल्याचे काही प्रत्यक्षदर्शंनी सांगितले. अशा स्थितीत ते इतर एखाद्या वाहनाला धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता होती, परंतु चालकाचे नियंत्रण सुटून ही गाडी रस्त्याच्या बाजूला झाडला धडकल्याने एअरबॅग उघडल्याने गाडीतील दोघांनाही फ ार गंभीर मार लागला नाही.