

कडा : आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीच्या प्रश्नावर आता बीडमध्ये जनआक्रोश व्यक्त होणार आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘दुष्काळी जलहक्क जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर (का.) तालुक्यांतील शेतकरी, नागरिक आणि सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘चलो बीड! पाण्याच्या हक्कासाठी जनआक्रोश!’ आणि ‘पाणी द्या, जीवन द्या!’ अशा घोषणांसह हा लढा उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर (का.) तालुक्यांना कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील हक्काचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, ही मोर्चाची प्रमुख मागणी आहे. नदीजोड प्रकल्पांतर्गत या तीन तालुक्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मतदारसंघातील केटी बंधाऱ्यांची दुरुस्ती करून ग्रामीण जलसिंचन व्यवस्था बळकट करावी, अशीही मागणी आहे. कुकडीचे पाणी सिना व मेहकरी तलावात सोडण्यासाठी कायमस्वरूपी पाणी रोटेशन निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे तातडीचे अनुदान द्यावे, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येणार आहे.
दुष्काळाच्या काळात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने मोठ्या जनावरांसाठी दररोज १०० रुपये, तर लहान जनावरांसाठी ५० रुपये चारा-पाणी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता संबंधित ग्रामपंचायतींना थेट टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत, अशीही मागणी आहे.
या सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका माजी आमदार भीमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी घेतली आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी, नागरिक आणि सर्वसामान्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर (का.) तालुक्यांना कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील हक्काचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे.
नदीजोड प्रकल्पांतर्गत आष्टी-पाटोदा-शिरूरसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी.
मतदारसंघातील केटी बंधाऱ्यांची दुरुस्ती करून ग्रामीण जलसिंचनाला बळकटी द्यावी.
कुकडीचे पाणी सिना व मेहकरी तलावात सोडण्यासाठी कायमस्वरूपी पाणी रोटेशन निश्चित करावे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे तातडीचे अनुदान द्यावे.
मोठ्या जनावरांसाठी दररोज १०० रुपये व लहान जनावरांसाठी ५० रुपये चारा-पाणी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे.
टँकर व्यवस्थेसाठी निविदा न काढता संबंधित ग्रामपंचायतींना थेट टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत.