

बीड : जिल्ह्यातील टाकळी (ता. केज) येथील मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध विलास घुले यांचा मित्र उमेश माने याच्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात केजचे उपविभागीय अधिकारी (IPS) व्यंकटराम यांच्या पथकाने न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयीन कोठडीत असलेल्या ९ आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भांडण सोडवताना झाला होता घुले यांचा खून
उमेश माने याने एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणावरून केज-मांजरसुंबा रोडवरील विलास घुले यांच्या 'बळीराजा हॉटेल'वर महिलेच्या नातेवाईकांनी उमेश माने याला मारहाण सुरू केली. जीव वाचवून पळणाऱ्या उमेश माने याला वाचवण्यासाठी हॉटेल मालक विलास घुले पाठीमागे धावले असता, जमावातील एकाने घुले यांच्यावर धारदार चाकूने वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांच्या तक्रारीवरून बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गुरुबा कदम, अजय रामराजे कदम, दीपक परसराम कदम, नवनाथ परसराम कदम, संतोष नरहरी कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम रामभाऊ गायकवाड, भैयासाहेब गायकवाड आणि जीप चालक अशा १० जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणाचा तपास SIT पथकाचे प्रमुख व्यंकटराम यांच्याकडून सीआयडी (CID) कडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेच्या वेळी उमेश माने याला आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. उमेश माने याच्या तक्रारीवरून वरील ९ आरोपींवर ॲट्रॉसिटीसह इतर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तपासी अधिकारी व्यंकटराम यांच्या पथकाने या आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मुख्य संशयित उमेश माने अद्याप फरार
पीडित महिलेच्या तक्रारीवरून उमेश माने याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, घटनेनंतर आरोपी उमेश माने हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा तीव्र शोध घेत आहेत.