

केज :- केज तालुक्यातील विडा येथे अवैध्यरीत्या बेकायदेशीर रीत्या विक्रीसाठी साठा करून ठेवलेले अठरा हजाराचे सुमारे २०० लिटर डिझेल छापा मारून ताब्यात घेत कारवाई केली आहे.
विडा ता. केज येथील एका टायर वर्क्स दुकानात विनापरवाना व अवैधरित्या पेट्रोल व डिझेलचा साठा करून बाजार भावापेक्षा जास्त भावाने विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत केज पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलीस अंमलदार संतोष गित्ते, पोलिस जमादार शिवाजी कागदे, शहादेव म्हेत्रे, नितीन जाधव यांच्या पथकाने १ मे रोजी सायंकाळी ५:२५ वा. अचानक छापा मारला.
यावेळी दुकानात दोन काळ्या व एक पांढऱ्या अशा तीन कॅनमध्ये ५८ लिटर डिझेल आढळून आले. सदर दुकानदार दुकानात आढळून न आल्याने पंचाकडे दुकानदाराच्या नावाची विचारणा केली असता त्याचे नाव ईश्वर अशोक ढोबळे असे असल्याचे सांगितले. त्या नंतर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता घरामध्ये चार कॅनमध्ये १४० लिटर डिझेल आढळून आले. पोलिसांनी दुकान व घरातून १८ हजार ४५० रुपयांचे १९८ लिटर डिझेल जप्त केले. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण काही किर्तने यांच्या फिर्यादी वरून ईश्वर ढोबळे विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं २५५/२०२६ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ सह कलम ३, ७ भा. न्या. सं. १२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे तपास करीत आहेत.