Beed Crime: वाहन फिटनेस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश; नोएडातून सॉफ्टवेअर अभियंता अटकेत

बीड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सरकारी वाहन डेटाबेसमध्ये फेरफार केल्याचा संशय
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

बीड : वाहनांची प्रत्यक्ष तपासणी न करताच ऑनलाइन फिटनेस प्रमाणपत्रे जारी केल्याच्या गंभीर प्रकरणात बीड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एका सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करत असून, सरकारी वाहन डेटाबेसमध्ये अनधिकृत फेरफार करून वाहनांच्या नोंदी बदलल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तपास अधिकारी आयपीएस वेंकटराम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान आशिष कडियान याला नोएडा येथून अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपी Velocis Systems Pvt. Ltd. या कंपनीत कार्यरत असल्याचे समोर आले आहे. ही कंपनी NICSI मार्फत विविध शासकीय माहिती-तंत्रज्ञान प्रकल्पांवर काम करते. आरटीओशी संबंधित सॉफ्टवेअर आणि NIC च्या डेटाबेसची माहिती असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने वाहनांच्या नोंदींमध्ये अनधिकृत फेरफार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाहनांच्या फिटनेस स्टेटस, सीएनजी स्टेटस, कर नोंदी तसेच अन्य माहितीमध्येही बदल करण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे.

एसआयटीच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक त्रुटी (Bug) ठेवून किंवा SQL Injection तंत्राचा वापर करून NIC च्या बॅकएंड डेटाबेसमध्ये प्रवेश मिळवला होता का, याचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा बायपास करणे, डेटाबेस लॉग हटवणे आणि फेरफार लपविण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.

तपासादरम्यान आतापर्यंत किमान एका वाहनाच्या नोंदीत अनधिकृत फेरफार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा प्रकार केवळ एका वाहनापुरता मर्यादित नसून अनेक वाहनांच्या नोंदी बदलण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासाठी डिजिटल पुरावे, डेटाबेस रेकॉर्ड आणि तांत्रिक लॉगचे सखोल फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज तयार करणे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या आंतरराज्यीय सायबर गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार झाले आहेत का आणि देशभरातील इतर वाहनांच्या नोंदींमध्येही अशाच प्रकारे फेरफार करण्यात आले आहेत का, याचा सखोल तपास एसआयटीकडून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news