Beed Crime News | बीडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; नाशिकच्या पीडितेची सुटका
Beed Crime News
बीड : शहरातील गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सारडा कॅपिटलमधील एका तळघरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू होता. ही माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कारवाई केली. यामध्ये चालकाला बेड्या ठोकल्या असून नाशिकच्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
प्रमोद सदाशिव शेळके (रा.नेकनूर ता.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. बीड शहरातील सारडा कॅपिटल परिसरात एका कोपऱ्यातील तळघरात ब्लीस नावाचे स्पा सेंटर आहे. याच ठिकाणी मागील काही दिवसांपासून वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती होती. मंगळवारी सायंकाळी बीड शहर पोलिसांनी डमी ग्राहकाला एक हजार रूपये देत स्पा सेंटरमध्ये पाठविले. आतमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. यात एका पीडितेची सुटका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुशेन पवार, सचिन अलगट, रेश्मा कवळे आदींनी केली.

