Beed News | चौकशी समितीच्या विरोधात शिरूरघाटच्या माजी सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पंधराव्याच्या निधीतून कामे न करता ४२ लाखाचा अपहार
Beed News | चौकशी समितीच्या विरोधात शिरूरघाटच्या माजी सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Beed News | चौकशी समितीच्या विरोधात शिरूरघाटच्या माजी सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Published on
Updated on

केज :- शिरूरघाट (ता. केज) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संगनमताने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्यक्ष कामे न करता ४२ लाख २५ हजार ५६४ रुपयांचा अपहार केल्याच्या तक्रारी वरून बीडीओंनी नेमलेल्या चौकशी समितीने चुकीचा अहवाल दिल्या वरून तक्रारदार माजी सरपंचाने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्याच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

शिरूरघाट ता. केज येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीतून प्रत्यक्ष कामे न करता ४२ लाख २५ हजार ५६४ रुपयांचा निधी परस्पर उचलून गैरव्यवहार केल्याची तक्रार माजी सरपंच अशोक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर हजारे, महादेव तांबडे आणि दिपक सांगळे यांनी २० मार्च रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी ए. एस. राठोड, जि. प. बांधकामचे उपअभियंता पी. एम. मिसाळ, विस्तार अधिकारी विजयकुमार मस्के या तिघांची चौकशी समिती गठित करून या समितीस तात्काळ सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट व अभिप्रायसह चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार या समितीने चौकशी करीत ४ मे रोजी अहवाल दिला आहे. मात्र समितीने सरपंच व ग्रामसेवकांकडून पैसे घेऊन हा अहवाल पूर्ण चुकीचा दिला असल्याचा आरोप माजी सरपंच अशोक गायकवाड यांनी केला आहे.

या चौकशी समितीवर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा ८ मे रोजी पंचायत समितीसमोर गनिमीकाव्याने आत्मदहन करू. असा इशारा माजी सरपंच अशोक गायकवाड यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ४ मे रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला होता.

दरम्यान दि. ७ मे रोजी दुपारी १२:०० च्या सुमारास माजी सरपंच अशोक गायकवाड आणि त्यांचे समर्थक यांनी पंचायत समिती कार्यालयातील सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड यांच्या दालनात जाऊन अंगावर पेट्रोल सदृष्य ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी हजर असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे आणि पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे यांनी त्यांना अडवून हातातील ज्वलनशील पदार्थाची बाटली आणि आगपेटी हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला

सहाय्यक गटविकास अधिकारी अनुपस्थितीत

चुकीच्या चौकशी अहवालामुळे माजी सरपंचांनी ज्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्या दालनात राठोड हे अनुपस्थित होते. तर या वेळी प्रशासकीय अधिकारी सौ. वणवे मॅडम यांनी आंदोलकांना त्यांच्या मागणी प्रमाणे त्रयस्थ अधिकाऱ्यांच्या समिती मार्फत चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news