

बीड, पुढारी वृत्तसेवा : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपी होते. आता त्यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे. ९ डिसेंबररोजी संतोषी देशमुख हे कोठे आहेत ? कोठे जाणार आहेत ? याबाबतचे सर्व लोकेशन सिद्धार्थ सोनवणे हा सुदर्शन घुले यांच्यासह इतर आरोपींना देत होता, असे तपासात समोर आले होते. त्यामुळे त्याच्या देखील मागावर पोलीस होते. तो कल्याण येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांच्यासह त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मसाजोग गावातील मूळ रहिवासी..
- वय वर्ष 35 सिद्धार्थ सोनवणे हा सुशिक्षित बेरोजगार.
- गुंड प्रवृत्ती इतिहास.. सुदर्शन घुलेचा सहकारी..
- संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर रास्ता रोको आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमातील सहभागी..
- सिद्धार्थ सोनवणे आणि सुदर्शन घुले यांची जुनीच मैत्री..
- आई वडील मोलमजुरी करून गुजरान करतात आर्थिक परिस्थिती बेताची..
- हत्येच्या दिवशी केज शहरातून सरपंच संतोष देशमुख गावी निघाले असता सिद्धार्थ सोनवणे यांनी लोकेशन सुदर्शन घुले यांना दिल्याचा संशय
या हत्याकांडात ज्या सिद्धार्थ सोनवणे यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सरपंच संतोष देशमुख यांची माहिती दिली नसती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता.
सिद्धार्थ सोनवणे हा मारेकऱ्यांना माहिती देऊनही संतोष देशमुख यांना न्याय द्या, म्हणून केलेल्या रस्ता रोकोसह अंत्यविधीला देखील हजर होता. सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सहभाग असल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला होता.
केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे फरार होते. यातील सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले 26 दिवस ते फरार होते. त्यांच्या मागावर बीड पोलिसांचे पथक होते. परंतु ते हाती येत नसल्याने पोलिसांवरील दबाव वाढतच होता. यादरम्यान रात्री एका डॉक्टरची तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.