

शिरूर : कुलभूषण महात्मा समर्थ स्वामी नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धाकटी पंढरी श्री. क्षेत्र नारायण गड येथे संत -महंत, गडाची विश्वस्त मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज (दि. ११) गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून महंत संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने गडावर मोठा सोहळा पार पडला.
महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र गडाने वर्षानुवर्ष समाज उद्धाराचे कार्य केले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांना या ठिकाणी अध्यात्माची शिकवणही मोठ्या अट्टाहासाने दिली जात आहे. यामुळे श्री क्षेत्र नारायण गड हे तीर्थक्षेत्र अध्यात्माच्या पटलावर गुरुस्थानी आहे. श्री. क्षेत्र नारायण गडाचे आठवे उत्तर अधिकारी (मठाधिपती) वै. महंत महादेव महाराज यांचे १९ जुलै २०११ रोजी वैकुंठगमन झाले होते. यावेळी गडाचे नववे उत्तराधिकारी कोण हा प्रश्न येथील विश्वस्त मंडळी सह पंचक्रोशीतील संत-महंत भाविक भक्तांना पडला होता. यातच धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गडाची वर्षानुवर्षे पायी वारी करणारे, गडावरती आणि आपल्या गुरु वरती निष्काम निष्ठाण ठेवणारे वारकरी म्हणून महंत शिवाजी महाराज यांचे नाव समोर आले होते.
मागील काही वर्षापासून त्यांची वै. महादेव महाराज यांच्या सानिध्यामध्ये गडाची मोठी सेवा झाली होती. श्री क्षेत्र नारायण गडाचे निष्ठावंत वारकरी आणि वै. महंत महादेव महाराज यांचे शिष्य म्हणून शिवाजी महाराज यांच्याकडे पाहिले गेले आणि विश्वस्त समितीने गडाचे नववे मठाधिपती म्हणून महंत शिवाजी महाराज यांचे दि. २० जुलै २०११ रोजी नाव घोषित केले. किंबहुना महंत शिवाजी महाराजांच्या हस्तेच वै. महादेव महाराजांचा समाधी सोहळा संपन्न झाला. या दिवसांपासून महंत शिवाजी महाराज यांनी गडाचा चेहरा -मोहराच बदलून टाकला.
श्री क्षेत्र नारायण गडावरती कोट्यावधी रुपयांचे विकास कामे झाली. गडाचे चोहीकडे बाजूने बांधकाम झाल्यामुळे श्री क्षेत्र नारायण गड हा केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रामध्ये भगवा झेंडा फडकून आपला नावलौकिक वाढवू लागला. महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते विविध विकास कामे तर झालीच. परंतु, धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाला ही मोठी गती व व्यापकता प्राप्त झाली आहे. या ठिकाणचे नारळी सप्ताहसह, पार पडणारे विविध सोहळे आकाशाला गवसणी घालत असतात.
गडाचे कार्य हे अबाधित मोठ्या नेटाने पार पडावे यासाठी महंत शिवाजी महाराज यांनी विश्वस्त समितीला विश्वासात घेऊन मादळमोही येथील जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे मठाधिपती महंत संभाजी महाराज यांची गडाचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. काही कुणकुण कानी पडत असायची. आज ही कुणकुण सत्यात उतरली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसे संभाजी महाराज ही वर्षानुवर्षे नारायण गड हा आपला गुरुस्थान आपली सेवा समर्पित करत आले आहेत. म्हणूनच या ठिकाणी गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून महंत संभाजी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज गडावरती श्री. नगद नारायण महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा प्रति वर्षाप्रमाणे याही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला टाकण्यात आली. यावेळी महंत शिवाजी महाराज, महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, जनार्दन महाराज शिंदे, महंत मधुकर महाराज गवारे, प्रकाश महाराज बोधले, सत्यवान महाराज लाटे, नाना महाराज कदम आदी संत -महंतासह विश्वस्त समितीचे सचिव ॲड. महादेव तुपे, दिलीप गोरे, जे. पी. शेळके, गोवर्धन काशीद, राजेंद्र मस्के, बळीराम गवते ही सर्व विश्वस्त मंडळी सह श्री क्षेत्र नारायण गडाचे सर्व टाळकरी, गुणवान मंडळी व हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे श्री. नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त किर्तन ही पार पडले. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
श्री. क्षेत्र नारायण गडाची उभ्या महाराष्ट्रामध्ये अध्यात्म आणि धर्म कार्याबद्दल ख्याती आहे. येथील परंपरेने प्रत्येकाशी सौजन्याने वागून समाज घडवण्याचे कार्य केले आहे. ही परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आता महंत शिवाजी महाराज यांच्यासह ट्रस्ट समितीने माझ्यावर टाकली आहे. उपस्थित संत -महंत भाविक भक्त यांच्या साक्षीने माझ्या जीवनातील हा सर्वाधिक मोठा सोहळा आज पार पडत आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. गुरुवर्य महंत शिवाजी बाबांचा शब्द मी खाली पडू देणार नाही. आणि येथील परंपरेने गडाचे धार्मिक कार्य, आणि माजी सेवा समर्पित करत राहील, असे अभिवचन यावेळी गडाचे नूतन उत्तराधिकारी संभाजी महाराज यांनी दिले आहे.