

अतुल शिनगारे
धारूर: माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणात माजलगाव नगरपरिषद निवडणुकीपूर्वी एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करणारे नेते निवडणूक संपल्यानंतर मात्र एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आ. प्रकाश सोळंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विधानसभा नेते मोहन जगताप, माजी नगराध्यक्ष साहल चाऊस तसेच बहुजन विकास मोर्चेचे बाबुराव पोटभरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली होती. या माजलगाव नगरपालिका निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार बहुमताने निवडून आल्यानंतर आ.सोळंके यांचा राजकीय बालेकिल्ला ढासळल्याचे मानले गेले. मात्र त्यानंतर झालेल्या विविध पदग्रहण व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हेच नेते एकत्र येत, हारफुलांच्या सत्कारात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
माजलगावच्या विकासासाठी किंवा वैयक्तिक राजकीय हितासाठी मतदारसंघातील सर्वच मंडळी एकत्र येऊ शकतात, हे या छायाचित्रातून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक काळात पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन कायमस्वरूपी वैर निर्माण करणारे अनेक छोटे कार्यकर्ते राजकीय संघर्षात आपले आयुष्य, व्यवसाय आणि संसार उद्ध्वस्त करून घेत असल्याचे वास्तव आहे. राजकीय भांडणांमुळे अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक संकटात सापडल्याची उदाहरणे समाजात दिसून येतात. नेते मात्र ‘निवडणूक म्हणजे निवडणूक, वैर कायमचे नसते’ असे सांगत परस्पर समन्वय साधतात.
निवडणूक संपताच राजकीय ॲडजस्टमेंट करून एकत्र येणाऱ्या या नेत्यांच्या भूमिकेमुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना मात्र दुर्लक्षित राहतात. काही मोजक्या लोकांना यातून आर्थिक व राजकीय लाभ मिळतो, तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मानसिक ताण, नैराश्य व व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. या छायाचित्रामुळे जिल्ह्यात ‘राजकारण नेमके कुणासाठी?’ हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेत्यांसारखे निवडणूक ते निवडणूक राजकारण करत स्वतःचा व्यवसाय, कुटुंब आणि आयुष्य सुरक्षित ठेवण्याचा धडा सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी घ्यावा, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. या राजकीय वास्तवामुळे तरी सर्वसाधारण कार्यकर्त्यांचे डोळे उघडणार का? हा प्रश्न माजलगाव विधानसभा सह संपूर्ण जिल्ह्यात विचारला जात आहे.
राजकीय नेते वारंवार सांगतात, "राजकारणात कायमस्वरूपी दुश्मनी नसते." मग हा नियम फक्त नेत्यांसाठीच आहे का?, कार्यकर्त्यांसाठी का नाही?, हा फोटो केवळ एक कार्यक्रमाचा क्षण नाही, तर तो आरसा आहे-ज्यातून सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी स्वतःकडे पाहिले पाहिजे. निवडणुकीपुरते राजकारण करा, पण आयुष्याची, संसाराची, व्यवसायाची होळी करू नका, हा या फोटोचा खरा संदेश आहे.
प्रश्न असा आहे की, या नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे तरी कार्यकर्त्यांचे डोळे उघडतील का?की पुन्हा पुढील निवडणुकीत तेच झेंडे, तेच शिव्याशाप, तेच भांडणं, आणि शेवटी तेच नेते एकत्र... आणि कार्यकर्ते मात्र उध्वस्त?माजलगावच्या या राजकीय चित्राने संपूर्ण जिल्ह्यात एक गंभीर चर्चा निर्माण केली आहे. राजकारण कोणासाठी आणि कशासाठी, याचा पुन्हा एकदा हिशेब मांडण्याची वेळ आली असल्याचे मत माजलगाव विधानसभा मधील सर्वसाधारण कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.