

परळी वैजनाथ : शेतकऱ्याकडे २ हजाराची लाच मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.३१) रंगेहाथ ताब्यात घेतले. सिरसाळा पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे पोलिस यंत्रणेत खळबळ माजली आहे. दत्ता निघूळ असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एका शेतकऱ्याचा ऊस वाहतूक करताना इतर काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने सिरसाळा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी दत्ता निघूळ यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. मात्र, पैसे स्वीकारताना संशय आल्याने संबंधित कर्मचाऱ्याने लाच स्वीकारली नाही. तरीही लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातच या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.