

गौतम बचुटे
केज : "मी नाशिकचा पंडित आहे, तुला चमत्कार दाखवतो," असे सांगून हातचलाखीने भाविकांची फसवणूक करणाऱ्या येवल्याच्या एका भामट्याला बीड स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. खड्याचा रुद्राक्ष करण्याच्या नादात सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या या टोळीतील एकाला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून 'चतुर्भुज' केले असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास काशिदवाडी येथील भिमा सोनाजी जाधवर (वय ५७) हे उपचारासाठी पुण्याला जाण्याकरिता केज बसस्थानकावर उभे होते. यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने स्वतःला 'नाशिकचा पंडित' असल्याचे भासवून जाधवर यांच्या अडचणी सोडवण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने हातातील खड्याचा रुद्राक्ष करून दाखवण्याची हातचलाखी केली.
यानंतर, जाधवर यांच्या हातातील ५ ग्रॅम वजनाची (किंमत २४ हजार रुपये) सोन्याची अंगठी काढून ती एका कापडात ठेवायला लावली. "दहा मिनिटांनी कापड उघडून बघ," असे सांगून ते दोन्ही भामटे तिथून पसार झाले. जाधवर यांनी कापड उघडून पाहिले असता अंगठी गायब झाली होती आणि दोन्ही भामटेही नजरेआड झाले होते. याप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, हे भामटे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील 'मदारी' खेळ करणारे असल्याची खात्री पटली.
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने थेट येवला तालुक्यातील सावरगाव गाठले. तिथे अमजद नबाब मदारी याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार अशफाक राजू मदारी याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अमजद मदारीकडून चोरीला गेलेली सोन्याची अंगठी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी अशफाक मदारी याचा पोलीस शोध घेत असून, त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.