

Parli Vaijnath Chandapur Sai Temple Theft
परळी वैजनाथ : परळीपासून जवळच असलेल्या चांदापूर येथील श्री डोंगर तुकाई परिसरातील श्री साईबाबा मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दर्शनासाठी आलेल्या अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचा संशय असून, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी मंदिराचे विश्वस्त आणि पुजाऱ्यांनी केली आहे.
साईभक्त उद्योजक रवींद्र (पापा) गित्ते आणि परळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सभापती जयश्रीताई रवींद्र गित्ते यांच्या पुढाकारातून चांदापूर रस्त्यावर साईबाबा मंदिर उभारण्यात आले आहे. परळी शहरासह पंचक्रोशीतील भाविकांचे हे श्रद्धास्थान बनले असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.दर्शनाच्या निमित्ताने मंदिरात आलेल्या अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचा संशय सीसीटीव्ही फुटेजमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे उपलब्ध फुटेजची तपासणी करून संबंधित व्यक्तीची ओळख पटवावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विश्वस्त व पुजाऱ्यांनी केली आहे.
परळीहून चांदापूरमार्गे घाटनांदूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची नियमित वर्दळ असते. मंदिरातही भाविकांची ये-जा सुरू असते. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरासह चांदापूर मार्गावर ग्रामीण पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी साईभक्तांकडून होत आहे.