

परळी वैजनाथ: नगरपरिषद निवडणुकीनंतर मतदान यंत्र स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर या स्ट्रॉंगरूमवर निगराणी ठेवण्यासाठी आम्हाला गादी पलंगासह प्रवेश द्या अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्या देशमुख यांचे पती व नगरसेवकपदाचे उमेदवार दिपक देशमुख यांनी केली. दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांसह जमाव करुन प्रशासनशी वाद देखील घातला.
3 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता परळी नगरपरिषद कार्यालयासमोर 20 जणांच्या गटाने घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली. याप्रकरणात आता परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी फिर्यादी होवून दिपक देशमुखांसह 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी फिर्यादीत मध्यरात्रीच्या गोंधळाचा सविस्तर घटनाक्रम, पोलीसांशी लोकांनी घातलेली हुज्जत व दिलेली धमकी हे सर्व नमूद केले आहे. नगरपरिषद इमारतीतील स्ट्रॉंगरूम गार्डकडून माहिती मिळताच आपण व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावबंदी आदेशाची माहिती देत गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला; मात्र दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर, पद्मराज गुट्टे यांच्यासह उपस्थित 15 ते 20 कार्यकर्त्यांनी जागा सोडण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
परळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्ट्रॉंगरूम सुरक्षा ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नगरपरिषद कार्यालय गाठले. तेव्हा दीपक रंगनाथ देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर, पद्मराज गुट्टे, महादेव गंगने, मोहन मुंडे तसेच इतर 15 ते 20 जण गेटजवळ घोषणाबाजी करत असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला जमावबंदी आदेश लागू असताना संबंधितांनी विनापरवाना जमाव जमवून पोलीस निर्देशांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच तहसीलदारांनी स्ट्रॉंगरूमच्या दिशेने हालचाल होत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.आरोपी आबासाहेब देशमुख यांनी स्ट्रॉंगरूमकडे जाण्याचा प्रयत्न करताना अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून “बघून घेतो” अशी धमकी दिल्याचाही उल्लेख आहे.
या प्रकरणी नगर परीषद कार्यालयाचे समोर गेटवर विनापरवाना गैरकायद्याची मंडळी जमवुन जिल्हाधिकारी बीड यांचे जमावबंदी आदेशाचे व त्यासंबंधाने पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. यातील आरोपी आबासाहेब बालाजी देशमुख याने त्यास विनापरवानगी स्ट्रॉग रुममध्ये जाण्यापासुन रोखनारे अंमलदार यांना तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी दिली म्हणून संबंधित व्यक्तींवर तसेच दिपक देशमुख यांच्यासह २० जणांविरुद्ध भा.दं.सं. 2023 चे कलम 204, 193, 351(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.