

परळी वैजनाथ : हा माझा शेवटचा फोन आहे बाबा म्हणत युवकाने गावातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एका तरूणीने कानशिलात लगावल्याने झालेल्या आपमानामुळे तरूणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती वडिलांनी फिर्यादीत नमूद केली आहे.
परळी तालुक्यातील मोहा येथे गुरूवारी (दि.१४) ही मन सुन्न करणारी घटना घडली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रहार राजेभाऊ शिंदे (रा. मोहा) असे तरूणाचे नाव आहे.
चंद्रहार शिंदे याला गावातीलच एका तरुणीने १३ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष कानशिलात मारली होती. लोकांसमोर मुलीने मारल्यामुळे झालेल्या अपमानामुळे चंद्रहार नैराश्येत गेला होता. सर्वांसमोर अपमान झाल्याने हा मानसिक धक्का सहन न झाल्याने त्याने गुरूवारी (दि.१४) वडिलांना फोन करून हा माझा शेवटचा कॉल आहे.. यापुढे तुम्हाला माझा फोन येणार नाही असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर चंद्रहारने मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. मुलाचा शोध घेत असताना वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे मुलीने थोबाडित मारल्याने झालेल्या अपमानामुळे मुलाने नैराश्येतून जीवन संपविल्याची तक्रार चंद्रहारचे वडिल राजेभाऊ रामभाऊ शिंदे (रा. मोहा) यांनी पोलिसात दिली. त्यानुसार संबंधित तरुणीवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहीफळे पुढील तपास करत आहेत.