

Beed News: Youth from Maharashtra trapped in the web of cybercrime in Myanmar
बीड, पुढारी वृत्तसेवाः नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये नेण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथील स्वप्नील काळुंके या तरुणासह महाराष्ट्र आणि देशातील सुमारे १,००० हून अधिक तरुण आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळ्यांच्या विळख्यात अडकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तरुणांचा तिथे बेकायदेशीरपणे डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला जात असून, त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे पत्र पाठविले आहे.
खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र सचिव आणि म्यानमारमधील भारतीय दूतावासाला तातडीची पत्रे पाठवून या गंभीर प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या संवेदनशील प्रकरणामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अडकलेल्या मराठी तरुणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, केंद्र आणि राज्य सरकार यावर काय पावले उचलते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बीडमधील नांदूरघाटच्या स्वप्नील काळुंकेसह नाशिक, धाराशिव, चाळीसगाव, ठाणे आणि देशातील इतर राज्यांतील शेकडो तरुणांना परदेशात आकर्षक नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये नेण्यात आले होते. मात्र, थायलंड-म्यानमार सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या तथाकथित सायबर केंद्रांमध्ये या तरुणांना बंदुकीच्या धाकावर बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्याकडून जबरदस्तीने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीची आणि इतर अवैध कामे करून घेतली जात आहेत.
या बेकायदेशीर कामांना नकार देणाऱ्या भारतीय तरुणांना गंभीर स्वरूपाचा शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात आहे. त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जात असून, हे संपूर्ण प्रकरण मानवी तस्करी आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचे अत्यंत गंभीर स्वरूप असल्याचे खासदार सोनवणे यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले आहे.