

केज : तालुक्यातील सोनेसांगवी येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा आणि अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' रद्द करावेत, या मागणीसाठी गावच्या उपसरपंचाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या थरारक आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली होती.
सोनेसांगवी येथील शेतरस्त्यावर बब्रुवान केरबा कणसे आणि सतीश देशपांडे यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना वहिवाटीस, दैनंदिन ये-जा करण्यास आणि शेतीकामांसह ऊस वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी सोनेसांगवी गावचे उपसरपंच राहुल डिकले यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी आक्रमक पाऊल उचलले.
प्रशासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून उपसरपंच राहुल डिकले आणि सुरज इखे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून थेट आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी अंगावर डिझेलसदृश ज्वलनशील द्रव्य ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार शुभम पवार यांनी आंदोलकांशी मोबाईलवरून थेट संपर्क साधला. त्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेत शेतरस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तहसीलदारांच्या या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.