

माजलगाव : तालुक्यातील वांगी बु. येथील सरपंचाच्या कुटूंबातील सदस्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले याबाबत तहसिलदारांनी अतिक्रमण काढुन घेण्याबाबत सांगून देखील सरपंचाने हे अतिक्रमण काढले नाही. परिणामी जिल्हाधिका-यांनी या सरपंचावर अपात्रतेची कारवाई केली आहे.
तालुक्यातील वांगी - बु, ता. माजलगांव, जि. बीड येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक ही 2023 साली पार पडली. तसचे सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने अजय गुलाबराव जाधव यांची सरपंच म्हणुन निवड झाली. मात्र सरपंच यांच्या आई यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर बांधकाम देखील केलेले होते. तसेच सदरील अतिक्रमणाची नोंद ही ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण नोंद वहीमध्ये सन 1999 पासुन अस्तित्वात आहे.
सदरील अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंयाचत कार्यालयाने मा. तहसिलदार यांच्या निर्देशानुसार संबंधित अतिक्रमण धारक यांना नोटिस देखील बजावण्यात आली होती, मात्र तरी देखील सरपंच यांच्या आई यांनी सदरील अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यानंतर तक्रारदार श्री. वैजनाथ उत्तमराव जाधव, रा. वांगी-बु, ता. माजलगांव, जि. बीड यांनी मुंबई उच्च न्यायालायातील विधिज्ञ ॲड. ईश्वर वाघ यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयारत ग्रामपंचायत अधिकनियम 1958 च्या कलम 14 (ज) (3) प्रमाणे रितसर तक्रार दाखल केली.
सदरील तकारीच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना नोटिसा बजावुन, प्रत्यक्ष स्थळाचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. पंचनाम्यामध्ये संबंधित शासकिय जमिनीवर सरपंच यांच्या आईचे अतिक्रमण आढळुन आले, मात्र सरपंच यांचे पद वाचविण्यासाठी त्यांचे काही नातेवाईक यांनी सदरील अतिक्रमण हे सरपंच यांच्या आईचे नसुन त्यांचे आहे असे सांगु लागले, मात्र मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी अभिलेखावरी सर्व कागदपत्रांचा, पंचनाम्याचा, स्थळ पाहणी अहवाल, तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या जनाबाई विरूध्द महाराष्ट्र शासन या निकालातील निष्कर्षांचा सखोल विचार करून सरपंच यांनी त्यांच्या कुटुंबीयांमार्फत शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले सिध्द झाल्याने सरपंच यांना ग्रामपंचायत अधिकनियम 1958 च्या कलम 14 (ज) (3) नुसार पदावरून अपात्र घोषित केले.