

टाकरवन : माजलगाव तालुक्यातील राजेगाव परिसरातील उसाच्या शेतात कृष्णा गणपत राठोड रा. माली पारगाव तांडा, वय अंदाजे ५२ ते ५४ वर्षे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृताची ओळख अधिकृतरीत्या पटविली असून, मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर केवळ अंडरवेअर आणि बनियान असल्याची माहिती असून, दोन्ही हात पाठीमागे असल्याचेही समोर आले आहे. या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर तपासातील निष्कर्षानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा मृत्यू हत्या, आत्महत्या किंवा अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.