

गौतम बचुटे
केज : सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. या एका संकटाची चिंता असतानाच, आता कोवळ्या पिकांवर हरीण आणि रानडुकरांच्या कळपांचा हल्ला होऊ लागल्याने केज तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पिकांच्या संरक्षणासाठी महागडे उपाय करणे परवडत नसल्याने, आता शासनानेच या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यंदा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. जमिनीतील ओलाव्यामुळे पिके तरारून वर आली आणि सर्वत्र हिरवेगार चित्र निर्माण झाले. मात्र, ऐन पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके सुकू लागल्याने दुबार पेरणीचे संकट डोक्यावर घोंगावत आहे.
या नैसर्गिक संकटात आता वन्यप्राण्यांच्या त्रासाची भर पडली आहे. शेतातील कोवळ्या पिकांची चव चाखण्यासाठी हरीण आणि डुकरांचे कळप सर्रास धुमाकूळ घालत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध देशी जुगाड आणि प्रयोग करत आहेत. मात्र, हे प्राणी आता या उपायांनाही सरावले आहेत. अनेकदा तर आवाज करणाऱ्या साधनांच्या जवळ बसूनच ते पिकांची नासाडी करत असल्याचे चित्र दिसत आहे, असे शेतकरी सांगतात.
कुंपण : शेताभोवती साड्या, नायलॉन वायर किंवा ग्रीन शेडचे कुंपण घालणे.
बुजगावणे : पारंपरिक बुजगावण्यांचा वापर.
आवाजाचे प्रयोग : प्राण्यांचे आवाज काढणारे भोंगे किंवा हवेच्या झोताने फिरणाऱ्या पंख्यांना स्टीलचे ताट लावून आवाज करणे.
वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी आवाज करणारे भोंगे किंवा इतर उपकरणे बसवण्यासाठी एकरी २ ते २.५ हजार रुपयांचा खर्च येतो, जो अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे, एकीकडे पावसाची चिंता आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांचा त्रास, अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा किंवा त्यांच्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.