Beed News | जिल्हा परिषद शाळाच सकाळी, खासगी शाळांना सूट का?; शिक्षण विभागाच्या आदेशावर पालकांचा सवाल

Beed News | जिल्हा परिषद शाळाच सकाळी, खासगी शाळांना सूट का?; शिक्षण विभागाच्या आदेशावर पालकांचा सवाल
Published on
Updated on

गजानन चौकटे

बीड : बीड जिल्ह्यात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नसताना वाढते तापमान आणि कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मंगळवार (दि. २३) पासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र हा निर्णय केवळ जिल्हा परिषद शाळांपुरताच मर्यादित ठेवण्यात आल्याने पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

'उन्हाचा त्रास फक्त जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनाच होतो का? खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही त्याच वातावरणाचा सामना करावा लागत आहे. मग त्यांना या निर्णयातून वगळण्याचे कारण काय?' असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यंदा 'अल निनो'च्या प्रभावामुळे जून महिना संपत आला तरी बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण कायम असून दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून शाळांमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठीही दूरवरून पाणी आणावे लागत आहे. उष्माघातासह विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांनी शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सोमवारी (दि. २२) आदेश काढून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत भरविण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, मान्यताप्राप्त खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा या आदेशात समावेश नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सर्वांसाठी समान असल्याने हा आदेश जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळांना लागू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

"विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे असून जिल्ह्यातील सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा," अशी अपेक्षा पालक व विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news