

बीड : गतवर्षी पार पडलेल्या माजलगाव नगर पालिका निवडणुकीमध्ये ओबीसीसाठी आरक्षीत जागेवर मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुक लढवून विजयी झालेल्या रेखा आंबुरे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर पराभूत उमेदवार सुमनबाई मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी सुनावणी होवून जिल्हा समितीकडून कुणबी जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हे प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश दिल्याने रेखा आंबुरे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
माजलगाव तालुक्यातील खळवट लिंबगाव येथील मुळ रहिवासी रेखा अंकुशराव आंबुरे, सासरचे नाव रेखा प्रल्हादराव सरवदे यांनी इतर मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करत इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वार्डातून माजलगाव नगर पालिका निवडणुक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सुमनबाई मुंडे यांनी रेखा आंबुरे यांच्या असलेले कुणबी प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती.
या अर्जावर आणि पुराव्यावर सखोल सुनावणी झाली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानुसार रेखा अंकुशराव आंबुरे यांच्या कुणबी जातीचा दावा नियमानुसार अमान्य करण्यात आला आहे. त्यांचे कुणबी प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश पारित करण्यात आले. सदर निर्णय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, सदस्य उमेश सोनवणे, सदस्य सचिव श्रावस्ती मिश्राम यांच्या त्रिसदस्यीय समितीने एकमताने कुणबी प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला.
पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि माजलगावचे मुख्याधिकारी यांना अधिकृत प्रत पाठवून दिली. तक्रारदाराच्या वतीने अॅड.विकास मिसाळ यांनी काम पाहिले तर त्यांना अॅड.दीपक कुलकर्णी, अॅड.उदय दराडे यांनी सहकार्य केले. रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध असल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.