

केज :- केज तालुक्यातील एका वस्तीवरील षटकोनी आकाराच्या शाळेचे छत कोसळून शाळा जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने हा प्रकार रात्री घडल्याने अनर्थ टळला. याच धोकादायक इमारतीत 18 विद्यार्थी शिक्षण घेत होते. या प्रकारामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासना विरुद्ध तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या हलक्या पावसाने केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रातील घटक शाळा असलेल्या तरनळी येथील तांदळे वस्तीवरच्या एका असलेली षटकोनी आकारातील शाळेची इमारत अगदी पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली आहे.
हा प्रकार मध्यरात्री शाळा बंद असताना घडल्याने सुदैवाने अनर्थ टळला आहे. मात्र याच धोकेदायक असलेल्या इमारतीत तांदळे वस्तीवरील सुमारे १८ चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते. ग्रामस्थानी या धोकेदायक असलेल्या, अगदी हलक्या व रिमझिम पावसात शाळेच्या छतातून पाणी ठिबकत असल्याने शाळा धोकेदायक असल्याची माहिती शिक्षण विभागासह पंचायत समिती आणि महसूल विभागाला देखील कळविली होती. अशी माहिती वस्तीवरील रहिवाशी असलेले चांगदेव सानप यांनी दिली आहे. मात्र निर्ढावलेल्या प्रशासन काय ही शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अंगावर ढासळून मोठी दुर्घटना किंवा जीवित हानी होण्याची वाट पाहत होते की काय ? अशी संतप्त प्रतिक्रिया पालक आणि नागरिकांतून उमटत आहेत.
" या वस्ती शाळेच्या इमारतीचे छत पावसाने गळत असून पाणी ठिबकत असल्याची तक्रार ग्रामस्थ यांनी केली असल्याने आम्ही त्याची माहिती वरिष्ठांना दिली होती."
सुनील केंद्रे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
" आम्ही या धोकेदायक असलेल्या इमारतीची माहिती मागील दहा वर्षा पासून देत आहोत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. तसेच तांदळे वस्तीवर जाण्या येण्याच्या रस्त्याची देखील चाळण झालेली आहे. या प्रकरणी चौकशी होऊन विद्यार्थ्याच्या जीविताशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी आणि गुत्तेदार याच्यावर गुन्हा दाखल करावा.
चांगदेव सानप, नागरिक, सानप वस्ती