Beed Farmer Success Story | पदवीधर तरुणाची शेतीत 'कमाल'; केळीच्या बागेत आंतरपीक घेत कमावले ६ लाख

प्रकाश आणि फेरोमेन सापळे लावून केले किडिचे नियंत्रण
Beed Farmer Success Story | पदवीधर तरुणाची शेतीत 'कमाल'; केळीच्या बागेत आंतरपीक घेत कमावले ६ लाख
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर मातीतून सोनं उगवता येतं, हे केज तालुक्यातील भाटुंबा येथील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलं आहे. अमर चवरे या पदवीधर तरुणाने आपल्या दोन एकर केळीच्या बागेत आंतरपीक म्हणून खरबूज आणि टरबुजाची यशस्वी लागवड केली असून, अवघ्या ७० दिवसांत ६ लाखांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

नियोजनाची यशस्वी 'डोस'

अमर यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून दोन एकरात केळीची लागवड केली होती. केळी मोठी होईपर्यंत मधील जागेचा वापर करण्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आंतरपीक घेण्याचे ठरवले.

  • १ डिसेंबर: ३ हजार खरबुजाच्या रोपांची लागवड.

  • २० डिसेंबर: १० हजार टरबूज रोपांची लागवड.

  • तंत्रज्ञान: ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खतांचे अचूक नियोजन.

उत्पन्नाचा आकडा

कठोर मेहनत आणि नियोजनामुळे अमर यांना भरघोस फळधारणा मिळाली. त्यांनी १० टन खरबुजाच्या विक्रीतून १ लाख रुपये मिळवले. तर टरबुजाचे पीक इतके जोमदार आले की, एका फळाचे वजन ५ ते ८ किलोपर्यंत भरले. आतापर्यंत ५० टन टरबुजापैकी २५ टन टरबूज अडीच लाखांना विकले असून, उर्वरित २५ टन माल विक्रीसाठी सज्ज आहे. साधारण २ लाख खर्च वजा जाता त्यांना ४ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.

नैसर्गिक कीड व्यवस्थापन

केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता, अमर यांनी पर्यावरणापूरक शेतीवर भर दिला. पिकातील शत्रू किडींचा नाश करण्यासाठी त्यांनी फेरोमन सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा वापर केला. यामुळे मित्र किडींचे संवर्धन झाले आणि कीड नियंत्रणाचा खर्चही वाचला.

"तरुण शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतात मेहनत घेतल्यास निश्चितच आर्थिक प्रगती साधता येते."

— ज्ञानेश्वर चवरे, माजी पंचायत समिती सभापती

युद्धाचा निर्यातीला 'फटका'

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फळांची निर्यात मंदावली आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर झाला असून, अपेक्षित भाव मिळाला नाही. अमर चवरे यांच्या मते, जर बाजारभाव स्थिर असते, तर हेच उत्पन्न १० लाखांच्या घरात गेले असते.

" शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि आमचे अधिकारी तत्पर आहेत. तसेच तालुक्यामध्ये पिंपळगाव, आरणगाव, ढाकेफळ, कानडीमाळी या ठिकाणी भाजीपाला तर उंदरी, युसुफवडगाव, सोनेसांगवी, सादोळा या गावात १०० हेक्टरवर केळी लागवड झालेली आहे. फळबागा बरोबरच पालेभाज्या आणि फळबागांचे देखील क्षेत्र वाढत आहे.

- सागर पठाडे, तालुका कृषी अधिकारी, केज

अधिकारी आणि पत्रकारांकडून कौतुक

अमर चवरे यांच्या टरबुज पिकांची पाहणी करण्यासाठी माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चवरे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत वाघमारे, सहाय्यक कृषी अधिकारी शितल गोरे, आत्माचे समन्वयक योगेश पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी लोंढे, पत्रकार संतोष गालफाडे, पत्रकार रामदास तपसे, पत्रकार गौतम बचुटे, पत्रकार दशरथ चवरे, पत्रकार मुबाशीर खतीब हे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news