

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत असलेल्या आद्यकवी स्वामी मुकुंदराज समाधी जवळील कड्यावरून उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राधा नरेश लोमटे (वय २०) या युवतीचा जीव पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविला. गंभीर जखमी झालेल्या राधावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे याच ठिकाणावरुन संबधित युवतीच्या भावाने उडी मारुन जीवन संपवले होते. याचा मानसिक धक्का राधा हिला बसला होता अशी शक्यता व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी सुमारे बारा वाजता राधा लोमटे ही घरातून निघून थेट मुकुंदराज टेकडीवर गेली. मंदिराच्या कड्यावरून तिने थेट खाली उडी घेतली. घटनास्थळी काही नागरिक उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी कांदे, वडकर, मुंडे, चादर आणि चालक जरगर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचून त्यांनी तात्काळ खाली उतरून राधास गंभीर जखमी अवस्थेत वर आणले व तिला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
विशेष बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी राधा लोमटे हिच्या सख्ख्या भावाने देखील याच मुकुंदराज कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेचा मानसिक परिणाम राधाच्या मनावर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण घटनेबाबत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले की, "राधाला शंभर टक्के जीवदान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या पथकाने वेळेवर दाखवलेली तत्परता हीच तिच्या जीविताचे कारण ठरली." घटनेनंतर शहरात पोलीस पथकाच्या धाडसी कार्याची सर्वत्र स्तुती होत असून, सोशल मीडियावरही या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.