Beed news | वर्ष लोटले ,पैसे भरूनही सोलर पंप मिळेनात

Solar pump scheme Maharashtra news: पिकांना वाचवण्यासाठी थंडीत शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण कायम
Beed news
Beed news
Published on
Updated on

मनोज गव्हाणे

नेकनुर: रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचा 'काळोख' आणि 'कडाक्याची थंडी' सोसण्यापेक्षा शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पैसे भरून वर्ष लोटले तरी अनेक कंपन्यांनी अजूनही सोलार पंप बसवून दिलेले नाहीत. परिणामी, यंदाही शेतकऱ्यांना विजेचा लपंडाव आणि वन्यप्राण्यांच्या दहशतीत रात्र जागून काढावी लागत आहे. फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांवर कडक कारवाई करून त्यांना दंड करण्याची मागणी नेकनूर भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

स्वप्न सुविधेचे, वास्तव हालअपेष्टांचे

रब्बी हंगामात पिकांना पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, महावितरणच्या लहरी कारभारामुळे कधी महिनाभर वीज नसते, तर कधी रात्री-अपरात्री वीज पुरवठा केला जातो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाच्या सोलार पंप योजनेसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात कोटेशन भरले. रात्रीचे जागरण थांबेल आणि दिवसा पिकांना पाणी देता येईल, ही यामागची मुख्य आशा होती.

कंपन्यांचा निष्काळजीपणा; शेतकरी संतापले

काही सुदैवी शेतकऱ्यांना सहा महिन्यांत पंप मिळाले, मात्र अनेक शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना पंप बसवण्यासाठी शेतात खड्डे खोदायला लावले, पण प्रत्यक्षात साहित्य पोहोचवलेच नाही. वारंवार विनंती आणि अर्ज करूनही कंपन्यांकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका

सध्या रब्बीचा हंगाम जोमात आहे. अशावेळी शेतात पाणी देणे गरजेचे असताना शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. दिवसा वीज नसल्याने रात्रीची वाट पाहावी लागते. थंडीत रात्री पाणी देणे आरोग्यासाठी घातक ठरत आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती कायम आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच बत्तीस हजार पाचशे रुपये सोलर पंप साठी भरले मात्र शक्ती नावाच्या कंपनीने अजूनही सोलर दिलेले नाही. मागच्या महिन्यात संपर्क केला असता खड्डे खोदा पंधरा दिवसात बसवू म्हणून सांगण्यात आले, मात्र अजून बसवला नाही शिवाय आता तर संबंधित कंपनीचा कर्मचारी फोनही उचलत नसल्याने रात्रीचे जागरण आणि थंडी याला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने अशा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि ताबडतोब सोलर द्यावे.

संजय शिंदे ,शेतकरी नेकनूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news