

गौतम बचुटे
केज : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान, सासुरा येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता वाढला आहे. मठाधिपती आणि त्यांच्याच माजी उत्तराधिकारी यांच्यातील संबंध इतके बिघडले आहेत की, दोघांनीही थेट पोलीस ठाण्यात धाव घेत परस्परांवर गंभीर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात दोन्ही महाराजांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, 'मठाची गादी' आणि 'उत्तराधिकार' यावरून हा वाद टोकाला पोहोचल्याची चर्चा रंगली आहे.
ह.भ.प. केशव महाराज गित्ते (रा. नंदागौळ, परळी) यांनी १५ डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना मठाधिपती ह.भ.प. रतन महाराज यांनी स्वतः उत्तराधिकारी म्हणून सासुरा येथे आणले होते. मात्र, नंतर त्यांना अचानक मठातून हाकलून देण्यात आले.
केशव महाराज यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपल्याला का हाकलून दिले? याचा जाब विचारण्यासाठी केशव महाराज १४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता आपल्या गाडीने (क्र. एम एच- ४४/एस- ४५२८) सासुरा येथे गेले होते. यावेळी त्यांना लक्ष्मण उगले आणि त्यांच्या साथीदारांनी अडवले. केशव महाराज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, शिवीगाळ झाली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. लक्ष्मण उगले याने त्यांच्या गाडीच्या पुढील काचेवर दगड मारून ती फोडली. ह.भ.प. रतन महाराज, सुशन रामराव भोसले आणि लक्ष्मण उगले यांच्यापासून आपल्या जीविताला धोका आहे.
दुसरीकडे, मठाधिपती ह.भ.प. रतन महाराज यांनीही पलटवार करत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, केशव महाराज गित्ते यांना उत्तराधिकारी म्हणून आणले होते, पण ते अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याने त्यांना मठातून हाकलून देण्यात आले.
मठाधिपती रतन महाराजांनी तक्रारीत म्हटले आहे की, १४ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता केशव महाराज गित्ते आणि त्यांचा चुलत भाऊ कृष्णा गित्ते हे दोघे अंमली पदार्थांचे सेवन करून आश्रमात आले. त्यांनी रतन महाराज यांना 'का हाकलून लावले?' असे विचारून शिवीगाळ केली, मारहाण केली आणि ओढत आणले, तसेच गाडीत नेऊन अपहरण करण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रतन महाराज यांना मारहाण होत असताना किसनाबाई डोईफोडे यांनी आरडाओरडा केल्यामुळे बाळासाहेब उगले, बप्पा पाळवदे, दिगंबर उगले आणि सुहास उगले यांच्यासह इतर लोक जमा झाले. लोक जमा होताच केशव महाराज गित्ते पळून गेले. केशव महाराज गित्ते आणि कृष्णा गित्ते यांच्यापासून त्यांच्यासह इतर भक्तांच्या जीविताला धोका आहे.
केज पोलीस ठाण्यात दोन्ही महाराजांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून परस्परविरोधी अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक सोनवणे करत आहेत.