

Beed News : Dindi of students won the hearts of Raimohkar
रायमोह, पुढारी वृत्तसेवा: आषाढी एकादशीनिमित्त रायमोहा येथील मतिमंद निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणात पालखी व दिंडी मिरवणूक काढून उपस्थितांची मने जिंकली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात निघालेल्या या दिंडीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना गावातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले तसेच विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदविला. या दिंडीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांच्यामध्ये भक्ती, संस्कार आणि आत्मविश्वास रुजविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.