Beed News | ‘तीन पाणी योजनांनंतरही धारूरकरांचा घसा कोरडा’ ; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरुच!

पाणीपट्टीसाठी अडवणूक... मग पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही, नागरिकांचा सवाल
Beed News
Beed News
Published on
Updated on

अतूल शिनगारे

धारूर : धारुर शहरासाठी सध्या तीन पाणीपुरवठा योजना सुरू असतानाही नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. विविध कारणांमुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असून, भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे “तीन योजना असूनही धारूरकरांचा घसा कोरडाच” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून शहरात पाण्याच्या प्रश्नावर राजकारण सुरू असले, तरी या समस्येचे ठोस निराकरण अद्याप झालेले नाही. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

नगरपालिकेतील स्थितीही चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे. नगरसेवकांपेक्षा त्यांच्या प्रतिनिधींचीच जास्त हालचाल दिसून येत असून, प्रत्यक्ष कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेले काही प्रतिनिधी प्रत्यक्ष पाणी नियोजनात मात्र अपयशी ठरत असल्याची नागरिकांची नाराजी आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी कार्यालयात वारंवार अनुपस्थित राहत असल्याचीही तक्रार नागरिकांकडून होत आहे. ते नेमके बैठकांसाठी गेले आहेत की रजेवर आहेत, याबाबत स्पष्टता नसल्याने अनेक प्रशासकीय कामे रखडत आहेत. परिणामी, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवांवर परिणाम होत आहे.शहरातील विविध विकासकामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नगरपालिकेचे अभियंते प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत नसल्याची चर्चा असून, त्यामुळे कामाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्याधिकारींच्या निष्क्रियतेमुळे अभियंतेही कामावर लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच किमान चार दिवसांतून एकदा नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही जोर धरत आहे. याशिवाय, सर्व विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून दर्जेदार कामे करून घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.एकंदरीत, तीन पाणी योजना अस्तित्वात असूनही नियोजनाच्या अभावामुळे धारूर शहरात पाणीटंचाईची तीव्र समस्या कायम असून, प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीपट्टी साठी जशी नागरिकांची आढळून करतात त्याप्रमाणेच पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news