

धारूर : अपघातांचे केंद्र बनलेल्या धारूर घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. अरुंद रस्ता आणि संरक्षक भिंतींच्या दुरवस्थेमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. रविवारी (दि.२२) सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.
धारूरहून माजलगावकडे निघालेल्या ह्युंदाई कंपनीच्या कारचा (MH22AW2365) घाट रस्त्यावरील एका वळणावर चालकाचा ताबा सुटला. रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंती तुटलेल्या असल्याने कारला कोणताही अडथळा मिळाला नाही आणि ती थेट दरीत कोसळली. या अपघातात भीमराव पायाळ (वय ५८) आणि त्यांचे सख्खे भाऊ संदीप पायाळ (वय ५६) हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
धारूर घाट हा मृत्यूचा सापळा बनला असून, येथील अरुंद रस्ते आणि तुटलेल्या संरक्षक भिंतींमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेक वर्षांपासून नागरिक आणि प्रवासी या घाटाच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या घाटाच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र, या निधीवरून श्रेयवादाचे राजकारण सुरू असतानाच हा अपघात घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. "आतापर्यंत झालेल्या अपघातांत अनेकांचा जीव गेला, अनेकांना अपंगत्व आले, त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा संतप्त सवाल नागरिक आणि प्रवासी विचारत आहेत.